Saturday 9 May 2015

अस्तनीस सारुनी ..

अस्तनीस सारुनी, खड्ग हाती घेऊनी, निग्रही योद्धा पहा निघाला ..
बाणा भासे कणखर, निश्चयी ही दिसे नजर, ध्येयपूर्ती साठी सिद्ध जाहला ..

स्फूर्ती घे कशांतुनी, काय असे खोल मनी, माहित ना ज़रा ही कुणाला ..
संकल्पित खचित असे, उरीचे नव स्वप्न दिसे, दॄढतेने वाटतसे भारला ..

बुद्धी हेच प्रमुख शस्त्र, वैचारिक साथ अस्त्र, पाजळीत, शोध घेत चालला ..
तेज सूर्य तळपला, अंधःकार लोपला, तडफदार किती तो सरसावला ..

सिद्ध साध्य सिद्धता, कांही नसे कमतरता, प्रमेयास सोडवित चालला ..
जन सामान्यांतला, चंद्र चांदण्यांतला, वलयांकित होऊनी प्रकाशला ..

अस्तनीस सारुनी, खड्ग हाती घेऊनी, निग्रही योद्धा पहा निघाला ..
बाणा भासे कणखर, निश्चयी ही दिसे नजर, ध्येयपूर्ती साठी सिद्ध जाहला ..

विजय साठे ..
०९ / ०५ / २०१५ 

No comments:

Post a Comment