Tuesday 19 May 2015

दूर दूर लांब वरी ..

दूर दूर, लांब वरी, दिसे एक छान परी,
हात हलवुनी, मला खुणावते ..
कुठे असशी हरवला, ओळखले कां मला,
एक सारखी, अशी विचारते ..

जरा ही ना आठवे, कोण असे ती बरे,
विचारांत मी स्वतःच गुंतलो ..
तरी ही कांही न स्मरे, ओळखे ती, हे ही खरे,
कांहुरांत अशा मीच वेढलो ..
तिथुनच ती, हसुन मला, दूर करी चिंतेला,
कांहीसे असेच ती सांगते ..
कुठे असशी हरवला, ओळखले कां मला,
एक सारखी, अशी विचारते ..

विनवतो मनांस मी, सांग शोध घेऊनी,
कोण असे, ती अशी रे, नाजुका ..
भूतकाळी जाऊनी, सारे पड़ताळुनी ..
पांही जरा, कोण असे, ती कालिका ..
ती मात्र तशीच तिथे, माझी गंमत बघते,
नविन हाव भाव, करित राहते ..
कुठे असशी हरवला, ओळखले कां मला,
एक सारखी, अशी विचारते ..

कांही करून समजेना, कोडे हे उमजे ना,
उत्तर कैसे याचे शोधावे ..
ती नक्की हितचिंतक, प्रश्न तरी हा जाचक,
काय आता मी तरी करावे ..
परीला आता कळले, तिला मी न ओळखले,
म्हणे, येऊन तुला समजविते ..
कुठे असशी हरवला ओळखले कां मला,
एक सारखी, अशी विचारते ..

परी आली मज जवळी, आणि म्हणे दे टाळी,
क्षणार्धांत, तुजला मी हरवले ..
कल्पना तुझ्या मनीची, अलौकिक प्रेमाची,
त्यांतच मी, अरे तुला गुंफले ..
कां असा तु गोंधळला, सांग ना आता तु मला,
शांत हो, तुला आता मी सावरते ..
कुठे पुन्हा हरवु नको, स्वतःला तु विसरु नको,
तुला आता, हेच मी रे, शिकविते ..

दूर वरली छान परी, येऊन माझ्या दारी,
हात हलवुनी, मला सुनावते ..
कुठे पुन्हा हरवु नको, स्वतःला तु विसरु नको,
मनां पासुनी, ती हे शिकविते ..  

विजय साठे ..
१८ / ०५ / २०१५ 








No comments:

Post a Comment