Saturday 30 August 2014

वाजला, वाजला .. 

वाजला, वाजला, ढोल ताशा वाजला ..
बाप्पा मोरया गजर, गगनी निनादला ..

गौरीपुत्र दर वर्षी, मानाने येतो ..
येताना सवे संग, आनंदा वाहतो ..
दुर्मिळ खजिना त्याने, भक्तांवर उधळला ..
वाजला, वाजला, ढोल ताशा वाजला ..

वक्रतुंड कुणी म्हणती, कुणी एकदंत ..
बुद्धीची देवता ही, अतीव बुद्धिवंत ..
खरा भक्त जो त्याच्या, पाठीशी तो राहिला ..
वाजला वाजला, ढोल ताशा वाजला ..

दहा दिवस अनुभवतो, भक्तांची भक्ती ..
प्रामाणिक भक्ती जशी, पुरवी तो शक्ती ..
जो वागे विपरित तो, क्षणांमधे संपला ..
वाजला वाजला, ढोल ताशा वाजला ..

वाजला, वाजला, ढोल ताशा वाजला ..
बाप्पा मोरया गजर, गगनी निनादला ..

विजय साठे ..
२९ / ०८ / २०१४ 






  

Sunday 24 August 2014

स्वप्न पाहिली .. 

स्वप्न पाहिली किती तरी मी, कुणी तरी माझे ऐका रे ..
अपुऱ्या  माझ्या इच्छा कारण, खिशांत नाही पैका रे ..

कितीक वेळा वाटले मला सूट बूट मी घालावे ..
रुबाबात त्या इथे तिथे मी, स्वतःला जरा मिरवावे ..
सूट बूट घ्यावेसे वाटती कसे घेऊ ते सुचवा रे ..
अपुऱ्या  माझ्या इच्छा कारण, खिशांत नाही पैका रे ..

गळ्यांत माझ्या चेन असावी, ब्रसेलेट ही हातावरी ..
राडो दुसऱ्या हाती असावे, स्वप्न मनी हे लई भारी ..
कसे घडावे हे सारे या, उपाय मजला सुचवा रे ..
अपुऱ्या  माझ्या इच्छा कारण, खिशांत नाही पैका रे ..

कुटुंबास फिरण्या मी न्यावे, असे कांहीं से येई मनी ..
कुठे जाऊ मी कसा जाऊ मी, येत नाही हे मज ध्यानी ..
उत्तर या प्रश्नाचे देखील, लवकर कुणीही सुचवा रे ..
अपुऱ्या  माझ्या इच्छा कारण, खिशांत नाही पैका रे ..

विजय साठे .. 
२५ / ०८ / २०१४    
गीत यावे तव गळ्यातुंन ..

लेखणी दे गीत आणि, वाद्य देई संगीताला ..
गीत यावे तव गळ्यातुंन, म्हणती दोघे गायकाला ..

लेखणीला माहिती ना, कसे सुचती शब्द ते ..
वाद्य ही प्रसवे सुरांना, जे जसे कुणी छेड़ी ते ..
पाहिजे आता असा जो, मनोगत हे समजला ..
गीत यावे तव गळ्यातुंन, म्हणती दोघे गायकाला ..

वाहे कधी शब्दांतुनी, करुणा रसाच्या कावडी ..
तर कधी ते वाहती, आनंद मिश्रित रेवडी ..   
शब्द गंगा पाजुनी, शमवा कुणी त्या चातकाला .. 
गीत यावे तव गळ्यातुंन, म्हणती दोघे गायकाला ..

शौर्य ध्वनी कधी कानी येई, तर कधी त्या प्रेम लहरी ..
भक्ती सूर ही कांही वेळा, भूपाळी ही कधी प्रथम प्रहरी ..
ओतून वाद्यांतुन सुरांना, जागवा साऱ्या जगाला ..
गीत यावे तव गळ्यातुंन, म्हणती दोघे गायकाला ..

सरसावला गायक आता हा, पाहुनी, ऐकून सारे ..
म्हणे शब्दां अन सुरांना, सारे तुम्ही, साथीस या रे ..
एक अभिनव गीत गाण्या, गायक असे तो सिद्ध झाला ..
गीत यावे तव गळ्यातुंन, म्हणती दोघे गायकाला ..

लेखणी दे गीत आणि, वाद्य देई संगीताला ..
गीत यावे तव गळ्यातुंन, म्हणती दोघे गायकाला ..

विजय साठे ..
२१ / ०८ / २०१४ 



Monday 18 August 2014

चांदणी 

आसमंत शांत शांत, किती किती हा एकांत,
अप्सराही लाजली ..
सवे रातीला घेऊन, मेघांना उलगडून,
चांदणी चमकली ..

चन्द्र कलेने  ढळला, रूपाने ओसरला,
काळोखी किती भरली ..
सवे रातीला घेऊन, मेघांना उलगडून,
चांदणी चमकली ..

दिशा काय समजेना, पायवाट गावसेना,
ती, ना अडखळली ..
सवे रातीला घेऊन, मेघांना उलगडून,
चांदणी चमकली ..

तारे असती अविचल, नक्षत्रे ही मलूल,
स्थिर जागी थांबली ..
सवे रातीला घेऊन, मेघांना उलगडून,
चांदणी चमकली ..

काळ्या पाठीवरती, उठून छान ती दिसती
चांदणी चिमुकली ..
सवे रातीला घेऊन, मेघांना उलगडून,
चांदणी चमकली ..  

विजय साठे ..
१८ / ०८ / २०१४  

   
दव बिन्दू ..   

पहाटेचा प्रहर नवा, घेऊन ये गारवा ..
टप टपता दव बिंदू, वाटतो हवा हवा ..

ओसंडे आनंदू, चोही कडे जाणवतो ..
गवतावर, पानांवर, सारीकडे पसरतो ..
नवा रोज तरी भासे, क्षण नी क्षण बरवा ..
टप टपता दव बिंदू, वाटतो हवा हवा ..

नयनांना जाणवते, तरीही ते कळते ..
स्पर्शाने काया कशी, भारावुन जाते ..
प्रचिती याची घ्यावी, कसे कधी ठरवा ..
टप टपता दवबिंदू, वाटतो हवा हवा ..

मोहविते स्वैर अशी, भटकंती पहाटे ..
आजु बाजू छान हवा, किती हलके वाटे ..
मंत्रमुग्ध होऊनिया, स्वतःलाच हरवा ..
टप टपता दव बिंदू, वाटतो हवा हवा ..

पहाटेचा प्रहर नवा, घेऊन ये गारवा ..
टप टपता दव बिंदू, वाटतो हवा हवा ..

विजय साठे ..
१८ / ०८ / २०१४