Tuesday 21 October 2014

करू या फेका फेक़ी 

करू या फेका फेक़ी, गंमत येईल भारी ..
वेदना हरवुनी जातील, अन हसेल दुनिया सारी ..

फणसाच्या झाडाला, लागेल टमाटर जेंव्हा ..
घड केळ्याचा येईल, जमिनीच्या खाली तेंव्हा ..
किती मजा ही येईल, खाताना त्यांना भारी ..
वेदना हरवुनी जातील, अन हसेल दुनिया सारी ..

मासे आकाशी उडतील, अन जलाशया मधी प्राणी ..
पक्षी भूमीवरी फिरतील, अन साप ही गातील गाणी ..
किती मजा ही येईल, घडताना हे शेजारी ..
वेदना हरवुनी जातील, अन हसेल दुनिया सारी ..

अवकाशांतुन येतील, त्या ऊष्ण अशा जलधारा ..
सागरतुनी उडतील, त्या मोठया मोठया गारा ..
किती मजा ही येईल, अनुभवता अशी ही न्यारी ..
वेदना हरवुनी जातील, अन हसेल दुनिया सारी ..

करू या फेका फेक़ी, गंमत येईल भारी ..
वेदना हरवुनी जातील, अन हसेल दुनिया सारी ..

विजय साठे ..
१४ / १० / २०१४