Monday 29 December 2014

हाती जपाची माळ घ्यावी ..

हाती जपाची माळ घ्यावी, नामस्मरण करावे ..
नेमाने त्या विधात्याचे, नाम मुखी भजावे ..

तोच देता तोच घेता, आठव त्याची व्हावी ..
जात्यावर जशी बसल्या वरती, ओवी सहज सुचावी ..
विचार चिंता दुसरे तेंव्हा, मनांत कांही नसावे ..
नेमाने त्या विधात्याचे, नाम मुखी भजावे ..

जप जाप्याने मिळते ऊर्जा, आणि शक्ती अमाप ..
संचय त्याचा सहजी जाणवे, कुणाही आपोआप ..
अनुष्ठान हे प्रत्येकाच्या, घरोघरी असावे ..
नेमाने त्या विधात्याचे, नाम मुखी भजावे ..

व्यथा कितीही अवती भवती, प्रत्येकाच्या असती ..
मुखी नाम ते घेता सार्या, क्षणार्धात विरघळती ..
तेजाने नामाच्या पुरते, जीवन उजळुन जावे ..
नेमाने त्या विधात्याचे, नाम मुखी भजावे ..

हाती जपाची माळ घ्यावी, नामस्मरण करावे ..
नेमाने त्या विधात्याचे, नाम मुखी भजावे ..

विजय साठे ..





आई तुझी आठवण .. 

आई तुझी आठवण, मनातील साठवण,
एकसारखी मला जाणवते ..
संस्कारांची शिकवण, पालन आणि पोषण,
वेळो वेळी मला आठवते ..

बालपणी चे ते क्षण, शिस्तीचे ते जीवन,
आजही मजला ते जागवते ..
यौवनातले ते मन, सुन्दर ते सहजीवन,
राहुन राहून मला ते स्मरते ..

कांहीं वेळी हसतांना, कांही वेळी रडतांना,
सावरणे तुझे मला ते दिसते ..
हांक तुला मारता, नाहीस तू आई आता,
कमतरता हीच किती सतविते ..

आई तुझी आठवण, मनातील साठवण,
एकसारखी मला जाणवते ..

विजय साठे ..
२२ / ११ / २०१४ 


  


फांदीवरी चिमणी पहा .. 

फांदीवरी चिमणी पहा, त्या चिमुकल्यांना भरवते ..
एकेक दाणा भरवुनी, ती कशी पहा त्यां जगवते ..

घरट्यातली पिल्ले रहाती, चोची अपुल्या उघडुनी ..
नक्कीच येईल पाणी दाणा, हीच खात्री ठेऊनी ..
माय ती येऊन जाऊन, भूक त्यांची शमविते ..
एकेक दाणा भरवुनी, ती कशी पहा त्यां जगवते ..

जिव्हाळ्याचे हे किती, नाते अतुट निर्मळ असे ..
बिलगता आईस पिल्ले, रम्य हे किती तरी दिसे ..
कष्ट करुनी माय ती, अपुल्या पिलां जोपासते ..
एकेक दाणा भरवुनी, ती कशी पहा त्यां जगवते ..

दिवस सरती होत जाती, मोठी तिची पिल्ले पहा ..
भुरभूर उडुनी जाती सारी, दिशांना ती त्या दहा ..
घरट्या मधे ती एकटी मग, वाट त्यांची पाहते ..
एकेक दाणा भरवुनी, ती कशी पहा त्यां जगवते ..

कां अशी ही वेळ तिज वर, यावी कुणी सांगेल का ..
काय चुकले आज वर, समजावुनी देईल का ..
दुःख वाटे किती मनी, पाहून द्रावक चित्र ते ..
शिदोरी वर आठवणींच्या, एकटी ती चालते ..

एकटी ती चालते ..

विजय साठे ..
०४ / १२ / २०१४