Thursday 11 June 2015

आनंदाच्या झाडांना ..

आनंदाच्या झाडांना, केवढी तरी पानं ..
सळसळ त्यांची, सुरुच असते, किती आनंदानं ..

वारा आला, पाऊस आला, कांही बिघडत नाही ..
थंडीचं, उन्हाळ्याचं, कांही कांही चालत नाही ..
संभाळून राहती स्वतःला, किती समजुतीनं ..
सळसळ त्यांची, सुरुच असते, किती आनंदानं ..

पक्षांना खेळू देती, अलगद फांद्यांवरी  ..
घरटी, पिलं, ती ही राहती, अंगा खांद्यांवरी ..
वाटप चाले आनंदाचा, अव्याहत जोमाने ..
सळसळ त्यांची, सुरुच असते, किती आनंदानं ..

कोण म्हणतो त्यांना, जराही दुःख नाही ..
वर वर पाहुन कुणाला, कळतं का हो कांही ..
मनांमधे त्यांच्या झाकुन, पहा कुणी प्रेमानं ..
तरीही, सळसळ सुरुच असते, किती आनंदानं ..

आनंदाच्या झाडांना, केवढी तरी पानं ..
सळसळ त्यांची, सुरुच असते किती आनंदानं ..

विजय साठे ..
०५ / ०६ / २०१५ 







  

Monday 8 June 2015

इथे तिथे जाऊ कुठे ..

इथे, तिथे, जाऊ कुठे, कळत मला नाही ..
गोंधळून, भरकटून, चोहिकडे पाही ..

असा, कसा, आलो अशा, नवीन ठिकाणी ..
नाही कुणी माझे, तरी, आहे हवा पाणी ..
हात हृदयाशी धरून, घाबरून राही ..
इथे, तिथे, जाऊ कुठे, कळत मला नाही ..

कां मी असा, आलो इथे, विचार ना केला ..
तोल माझा, असा कसा, क्षणार्धांत गेला ..
सैर भैर, झालो पुरा, सुचे ना जराही ..
इथे, तिथे, जाऊ कुठे, कळत मला नाही ..

कुणी माझे नाही, तसं नाही, माझे कांही ..
एकटा मी, खुळ्यावाणी, शोध घेत राही ..
रागावलो, माझ्यावरी, होई लाही लाही ..
इथे, तिथे, जाऊ कुठे, कळत मला नाही ..

किवाड़ परतीचे, कधीच बंद झाले ..
एकट्याने, जगणे हे, आता नशीबी आले ..
उरलेल्या आयुष्याची, आता नाही ग्वाही ..
इथे, तिथे, जाऊ कुठे, कळत मला नाही ..

इथे, तिथे, जाऊ कुठे, शक्य आता नाही ..
गोंधळून, भरकटून, खंत या जीवा ही ..

विजय साठे ..
०५ / ०६  / २०१५ 




Tuesday 2 June 2015

अगदी सहजा सहजी जडले, नाते आकाशाशी .. 

अगदी, सहजा सहजी जडले, नाते आकाशाशी ..
कल्पना ही ना, केली याची, मी माझ्या मनाशी ..

किनाऱ्यावरी, बसले होते, एका शांत पहाटे ..
एकटेपणा, एक सारखा, विचारांतुनी दाटे ..
वैचारिक मंथन चाले, मी हुज्जत घाली स्वतःशी ..
कल्पना ही ना, केली याची, मी माझ्या मनाशी ..

निसर्गासवे, जोडू जवळीक, असे ही होई चिंतन ..
वृक्ष असावे, वल्ली असाव्या, आणि असावे त्रिभुवन ..
नक्की कुणाला, माझे समजू, समजुन काय कशाशी ..
कल्पना ही ना, केली याची, मी माझ्या मनाशी ..

नभांगणातील, चन्द्र तारका, मोहुन मजला गेल्या ..
निर्णय झाला त्या, आज पासुनी, केवळ माझ्या झाल्या ..
अतूट नाते, जपतील निश्चित, केवळ त्या माझ्याशी ..
कल्पना ही ना, केली याची, मी माझ्या मनाशी ..

अगदी, सहजा सहजी जडले, नाते आकाशाशी ..
कल्पना ही ना, केली याची, मी माझ्या मनाशी ..

विजय साठे ..
०२ / ०६ / २०१५ 

ढोलकीची थाप आली कानावर ..

ढोलकीची थाप, आली कानावर ..
जीव आता, नाही माझा, थार्यावर ..

मैत्रीतल्या घोटांची, ओठांशी भेट ..
पायांची आप सात, झाली स्टेलमेट ..
जावे आता, वाटे मला, फडा वर ..
जीव आता, नाही माझा, थार्यावर ..

ठेक्याच्या बाजूला, सहज वळती पाय .. 
काळोखी वाट, आता करू तरी काय ..
भिस्त माझी, आता सारी देवा वर ..
जीव आता, नाही माझा, थार्यावर ..

उजवी कड़े, डावी कडे, कसा मी वळे ..
सहज होई, सारे तरी, मला ना कळे ..
यायला हवं, आता मला, भानावर ..
ढोलकीची थाप, आली कानावर ..

कसे काय, माहित ना, जागी मी आलो ..
रंग मंदिरात, कुठुन, कधी शिरलो ..
कुणी तरी, हाणली माझ्या, गालावर ..
जीव आता, नाही माझा, थार्यावर ..

काजवे तेंव्हा, डोळ्यांसमोर, किती चमकले ..
घाबरून, दचकुन मी, डोळे उघडले ..
होतो तेंव्हा, घरांत मी, पलंगावर ..
बायको माझी, तापली होती, भयंकर ..

वाट लागली पुरती, मला कांही सुचेना ..
कसली ढोलकी, कुठला ताल, कांही कळेना ..
आलो पुरता, मी आता, शुद्धीवर ..
माझ्या घरी, माझ्याच मी, पलंगावर ..

विजय साठे ..
०१ / ०६ / २०१५   


   

Monday 1 June 2015

जाई जुई वेलीवरी

जाई जुई वेलीवरी, हसती खेळती ..
अंग रंग एक, तरी ही, भिन्न प्रकृती ..

मागून पुढे पानांच्या, लपा छपी चाले ..
वाऱ्याच्या तालावर, वेल जशी हाले ..
दोघांनी जपलेली, जिवलग नाती ..
अंग रंग एक, तरी ही, भिन्न प्रकृती ..

बालपणा पासूनच्या, दोघी मैत्रिणी ..
परस्परां सांभाळुन, असती रागिणी .. 
हाव भाव नाजुकता, सहज दाविती ..
अंग रंग एक, तरी ही, भिन्न प्रकृती ..

रंग जरी एक असे, गंध मात्र वेगळे ..
कसे घड़े, कुणा ही ते, कारण ही, ना कळे ..
परमेश्वर कृतीची ही, अनुपम प्रचिती ..
अंग रंग एक, तरी ही, भिन्न प्रकृती ..
जाई जुईच्या माला, कांही माळती ..
ईश्वर चरणी कांही, अर्पण होती .. 
दोघीही सांभाळती, त्यांची महती ..
अंग रंग एक, तरी ही, भिन्न प्रकृती ..

जाई जुई वेलीवरी, हसती खेळती ..
अंग रंग एक, तरी ही, भिन्न प्रकृती ..

विजय साठे ..
०१ / ०६ / २०१५