Monday 13 April 2015

ती वेळ ..

ती वेळ अशी कां यावी, मनांला चटका लाउन जावी ..
कवंच कुण्डले निसटावी, माझी कठीण अवस्था व्हावी ..

कुणाला जाणीव ही ना कांही, मनाची घालमेल किती होई ..
कुणी तरी घातला घाला, त्याची कोण करील भरपाई ..

स्त्रोत तो, अखंड आठवणींचा, जाणवे, प्रवास आयुष्याचा ..
विलक्षण, अनुभव बालपणीचा, सुन्दर, प्रवास संस्कारांचा ..

सरले सारे ते जीवन, झाले एकाकी रे मन ..
पिता माता उरले नाही, कोण आता देई शिकवण ..

तरीही आवश्यक जगणे, आणि तसेच पुढती जाणे ..
याचे कारण नविन पिढीला,आहे संस्कारांचे देणे ..

हेच, समजावून मनांला, की तू, विसर त्या प्रसंगाला ..
पण, दुसरे मन मज सांगे, कसे विसरु माय पित्याला ..

बाजारी सारे मिळते, केवळ सोडून आईबापाला ..
श्रद्धांजली त्यांना वाहुन, तू आता शमवी मनांला ..

सुख सुखदुःखाच्या वेळेला, आठवा मायबापाला ..
आशिष घेऊन त्यांचे, वारसा जपा जो दिधला ..

विजय साठे ..
२७ / ०२ / २०१५ 

  
सप्तरंगी रंगुनी ..

सप्तरंगी रंगुनी, कल्पनांत हरवुनी,
स्वप्नांना सजवुनी, निघालो ..
नव्हते कधीही ध्यानी, किंवा कधी तसे मनी
कैफात आगळ्या मी, न्हालो ..

रंगात दंग मी, कारण स्वच्छंदी मी ..
वेगळाच अनुभवतो, हा नव आनंद मी ..
स्वतःशीच बोलुनी, हळु हळू चालुनी ..
माहीत ना मी कसा, तरंगलों ..
सप्तरंगी रंगुनी, कल्पनांत हरवुनी,
स्वप्नांना सजवुनी, निघालो ..

अनुभूती ही अशी, खचितच आहे खाशी ..
नवलाईच्या राशी, जाणिव ही ना जराशी ..
ठेवा हा उघडुनी, ख़ास कांही निवडुनी, विसावलो ..
सप्तरंगी रंगुनी, कल्पनांत हरवुनी,
स्वप्नांना सजवुनी, निघालो ..

कल्पनांच जरी असती, अप्रतीम तरी ठरती ..
ना कळता किती देती, सौख्याची त्या प्रचिती ..
वेचुनी त्यां साठवुनी, मनांमधे गाठवुनी ..
संगतीत त्यांच्या मी, रंगलो ..
सप्तरंगी रंगुनी, कल्पनांत हरवुनी,
स्वप्नांना सजवुनी, निघालो ..

विजय साठे 
२२ / ०२ / २०१५ 



  
साष्टांग आदरांजली ..

आप्पा नावांच वादळ, आप्पा नावांचा झंझावात, क्षणार्धात् शांत ..
एक प्रभावी पितृत्त्व  उत्तुंग नेतृत्त्व, अचानक निवांत ..

एक स्वयंभू व्यक्तित्त्व, परखड तत्त्व, एक स्वत्त्व ..
जाज्वल्य देशभक्त, एक सम्राट अनभिषिक्त ..

अनोखा विचारवंत, दूरदर्शी आणि धूर्त ..
जनांतील जन, तरीही, स्नेहांकित मानांकित ..

कणखर, तरीही नाजुक, कठोर, तरीही भावुक ..
उच्च अशा कीर्तीचा, आयोजक संयोजक ..

कुठे तुम्ही या पुढती, असाल ते कळवा ..
आमची ही पाउले, त्या वाटे वळवा ..

हळु हळू आम्ही ही मार्गस्थ तसे होऊ ..
आप्पा तुम्ही बोलवा आम्ही नक्की येऊ ..

पाठीवरील मायेला, आप्पा आम्ही मुकलो ..
क्षमा करा आम्हांला, जर कांही चुकलो ..

विजय साठे ..
१६ / ०२ / २०१५   



दूर दूर कुठे तरी ..

दूर दूर कुठे तरी, एका अद्न्यात स्थळी ..
हांक मारी कुणी तरी,मंतरल्या वेळी ..

भास असे का वास्तव, कळेल का ते लवकर ..
ना कळता पावले ही, चालती कशी भरभर ..
वाटते ठिकाण आता, आले अगदी जवळी ..
हांक मारी कुणी तरी, मंतरल्या वेळी ..

उत्सुकता किती वाढे, पुढे पुढे जाताना ..
आजु बाजू नजर फिरे, शोध तोच घेताना ..
कल्पनाच ही सगळी, वाटे हे नियती जुळवी ..
हांक मारी कुणी तरी, मंतरल्या वेळी ..

हांक असे प्रेमाची, अतिशय आपुलकीची ..
जाणवे ती जवळची, असावी ती स्नेहाची ..
आकर्षण इतके की, सहज ते मना जाळी ..
हांक मारी कुणी तरी, मंतरल्या वेळी ..

दूर दूर कुठे तरी, एका अद्न्यात स्थळी ..
हांक मारी कुणी तरी, मंतरल्या वेळी ..

विजय साठे ..
२६ / ०१ / २०१५ 

पहाटेच्या दवा मधे .. 

पहाटेच्या दवांमधे, कांहींच नाही कळले ..
आपोआप अंग माझे, चिंब चिंब भिजले ..

थंडगार वारा तो, हलवुन मज गेला ..
ये रे जरा खेळू या, कानाशी गुंजला ..
कल्पनेत त्या तशीच, डोळे मी मिटले ..
आपोआप अंग माझे, चिंब चिंब भिजले ..

ओळखीचा,नेहमीचा, स्पर्श मला भासला ..
तरीही तो, त्या वेळी, खूप छान वाटला ..
आनंदी त्या क्षणांत, देहभान हरपले ..
आपोआप अंग माझे, चिंब चिंब भिजले ..

ओथंबले मी ओतःप्रोत, त्या प्रातःकाली ..
तहान भूक, माझी कुठे, कोण जाणे विरली ..
हुंदडून, बागडून, खळखळुन मी हसले ..
आपोआप अंग माझे, चिंब चिंब भिजले ..

पहाटेच्या दवांमधे, कांहींच नाही कळले ..
आपोआप अंग माझे, चिंब चिंब भिजले ..

विजय साठे ..
२८ / १२ / २०१४   
मीच माझी सावली ..  

मीच माझी सावली अन, त्याच सावलीत मी ..
तरीही कधी बावरतो अन, कधी शांत शांत मी ..

सावली मला ती सांगे, जोडीदार तुझी असे मी ..
आजु बाजू दिवसा तुझिया, रातीला तुझ्यात मी ..
मनांतुनी कधीही आठव, असे आस पास मी ..
तरीही कधी बावरतो अन, कधी शांत शांत मी ..

नाते रे काय हे तुझे, माझ्याशी जडलेले ..
असे कधी स्वप्नही कोणा, नसेल रे पडलेले ..
सैर भैर तू जरी असशी, स्थिर मी निवांत मी ..
तरीही कधी बावरतो अन, कधी शांत शांत मी ..

समजुत ती किती घालते, कायम येता जातांना ..
बोल मला पढवित असते, साथ सवे मी असतांना ..
ना आता मी बावरतो, शांत मी कृतार्थ मी ..

मीच माझी सावली अन, त्याच सावलीत मी ..
ना आता मी बावरतो, शांत मी कृतार्थ मी ..

विजय साठे ..
१० / १२ / २०१४ 
अदॄश्य अशी शक्ती ..

अदॄश्य अशी शक्ती मला, सारखे खुणावते .. 
होईल उकल प्रश्नांची, असे मला सुचविते ..

धैर्याने घे बाळा, खचु नको मनांतुनी ..
धुके हळू हळु सरेल, प्रश्नांना घेऊनी ..
बाळकडू दृढतेचे, सारखे ती पाजते ..  
होईल उकल प्रश्नांची, असे मला सुचविते ..

विचलित ना चित्त करी, नेटाने जाई पुढती ..
अविचल जर मन असेल, उत्तरांची निश्चिंती ..
निग्रह माझ्या मनीचा, कायम ती वाढवते ..
होईल उकल प्रश्नांची, असे मला सुचविते ..

खंबीरपणा हाच खरा, पुरुषार्थाचा बाणा ..
सार्थ जीवनाचा हा, कानमंत्र तुम्ही जाणा .. 
क्षणोक्षणी घोषवाक्य, हेच सदा ऐकवते ..
होईल उकल प्रश्नांची असे मला सुचविते ..

अदॄश्य अशी शक्ती मला, सारखे खुणावते ..
होईल उकल प्रश्नांची, असे मला सुचविते ..

विजय साठे ..
०५ / १ २ / २०१५ 


  
बघा कसा, पुढे पुढे मी चाललो .. 

एका दिवसांत, वर्षाने मी वाढलो ..
बघा कसा, पुढे पुढे मी चाललो ..

पुढे मागे, किती तरी चालती ..
सारे ते, माझे असती सारथी ..
त्या डोलीमधे, मी असे विसावलो ..
बघा कसा, पुढे पुढे मी चाललो ..

माय बाप, पुढे असती, दिसती ते ..
त्याच वाटेवरी, माझे मन सुखावते ..
आनंद वनी, अश्या क्षणी मी नाहलो ..
बघा कसा, पुढे पुढे मी चाललो ..

किती दीस,असा पुढती जाऊ मी ..
काय नविन, या पुढती पाहु मी ..
देवा जवळ  जाण्या, आतुर मी जाहलो ..
बघा कसा, पुढे पुढे मी चाललो ..

विजय साठे ..
०३/१२ /२०१४