Tuesday 16 September 2014

निसटुन गेले, जे क्षण ..  

घटका गेल्या, पळे उलटली, तास ही झटपट सरले ..
निसटुन गेले, जे क्षण कधीही, उलटुन नाही परतले ..

लहानपण जे, अत्यानंदी, भुरभुर कधीच उडाले ..
वेगही इतका, मागे धावुन, कधीही नाही मिळाले ..
केली विनवणी, तरीही कोणा, नाही अजुन गवसले ..
निसटुन गेले, जे क्षण कधीही, उलटुन नाही परतले ..

लहानपण ते, क्षणांत विरले, तरूण पण अवतरले ..
कधी पोहोचलो, गृहस्थाश्रमी, मलाही नाही समजले ..
एकांती मी, असताना मज, तरूण पण आठवले ..
निसटुन गेले, जे क्षण कधीही, उलटुन नाही परतले ..

आता झालो, वृद्ध मी किती, मजला सहजी रुचे ना ..
लेखा जोखा, मांडुन ही मज, मेळ कधीही जमे ना ..
फरक क्षणांचा, लागे मज जे, प्रवासांत विरघळले ..
निसटुन गेले, जे क्षण कधीही, उलटुन नाही परतले ..

घटका गेल्या, पळे उलटली, तास ही झटपट सरले ..
निसटुन गेले, जे क्षण कधीही, उलटुन नाही परतले ..

विजय साठे .. 
१६ / ०९ / २०१४  


Sunday 14 September 2014

कांही क्षण ..

कांही क्षण सुखाचे, कांही दुःखाचे ..
कांही क्षण मानाचे, कांही अपमानाचे ..

क्षण कांही येती आणि, क्षणांत ते जाती ..
दुःखेही सरती, क्षणांत सुखेही अवतरती ..
क्षण ज्याचे त्याचे असती, जे ते स्वतःचे ..
कांही क्षण सुखाचे, कांही दुःखाचे ..

कोणी असे निर्धन येथे, कोणी धनवान ..
कोणी असे अशक्त आणि, कोणी पहेलवान ..
वाटेकरी असती सारे, अपुल्या नशिबाचे ..
कांही क्षण सुखाचे, कांही दुःखाचे ..

कोणी असे सद्न्यानी, तर कोणी अद्न्यानी ..
कोणी जगे कलंक घेऊन, कोणी मानाने ..
किमया ही सारी घडविती, हात विधात्याचे ..
कांही क्षण सुखाचे, कांही दुःखाचे ..

कांही क्षण सुखाचे, कांही दुःखाचे ..
कांही क्षण मानाचे, कांही अपमानाचे ..

विजय साठे ..
१४ / ०९ / २०१४   

Saturday 13 September 2014

दारा वरती, हलकी टक टक ..

दारा वरती, हलकी टक टक, करुनी कुणी विचारी ..
म्हणे, मला जर, जागा दिधली, मी तुमचा आभारी ..

वाटत होता, ओळखीतला, नांव तरीही स्मरेना ..
असे कसे हे, होई याचे, कारण मज उमजेना ..
असे विलक्षण, तेजस्वी अन, मुद्रा दिसे करारी ..
म्हणे, मला जर, जागा दिधली, मी तुमचा आभारी ..

आहे मी ही, तुमच्या पैकीच, नसे कोणी मी नवा ..
धकाधकीचे, जीवन जरी ही, तरी ही मज आठवा ..
म्हणे जिथे मी, जाई देतसे, कायम तिथे उभारी ..
म्हणे, मला जर, जागा दिधली, मी तुमचा आभारी ..

सुचे ना मला त्या वेळी मी आता काय करावे
मन सांगे मज एकसारखे त्याला घरांत घ्यावे
ठरले सरती दिधली जागा अनाहुता त्या प्रहरी
म्हणे, मला जर, जागा दिधली, मी तुमचा आभारी ..

हळू हळू मग, कळले सारे, गुपीत या कोडयाचे ..
वादळ होते ते, एक छानसे, उधाण आनंदाचे ..
आनंदाच्या, संगती आता, जुड़ती मंडळी सारी ..
म्हणे, आता तो, त्या सार्यांना, मी तुमचा आभारी ..

सांगत असतो, येता जाता, दुःखी नका कुणी होऊ ..
आनंदाने, खुल्या मनाने, दुःखा वाहुन नेऊ ..
सुखी जीवनाची, गुरुकिल्ली, आहे ही खरी न्यारी ..
राहीन आता, तुम्हां संगती, मी तुमचा आभारी ..

दारा वरती, हलकी टक टक, करुनी कुणी विचारी ..
म्हणे, मला जर, जागा दिधली, मी तुमचा आभारी ..

विजय साठे ..
१३ / ०९ / २०१४
 







Tuesday 9 September 2014

काय सांगू .. 

जेंव्हा कुणी, समोर माझ्या, बाटली पटकली ..
काय सांगू, तिथेच माझी, पुरती सटकली ..

आज दुपारी, डार्लिंगला मी, वेळ होती दिली ..
गेलोच नाही, वेळेवर नी, कसली भडकली ..
उभं आडव घेतल, माझी, जाम टरकली .. 
काय सांगू, तिथेच माझी, पुरती सटकली ..

कॉल आला साहेबाचा, लगेच येऊन भेट ..
केबिन मधे आत्ता मला, फायली घेऊन थेट ..
भुस्काट झालं, पुरतं कारण, बॉसची सरकली ..
काय सांगू, तिथेच माझी, पुरती सटकली ..

सटकली तर होती, वाटलं मित्रांना भेटावे ..
जड माझं डोके, त्यांच्या खांद्यावर टेकावे ..
दवा दारू घेऊन, पिऊन, कार्टी पसरली ..
काय सांगू, तिथेच माझी, पुरती सटकली ..

आलं कुणीतरी, तेंव्हा, वाजत गाजत आंत ..
येता येता पसरला तो, पुढल्या दरवाज्यात ..
तेंव्हाच कुणी, समोर माझ्या, बाटली पटकली ..
काय सांगू, तिथेच माझी पुरती सटकली ..

विजय साठे .. 
०९ / ०९ / २०१४ 



   

Saturday 6 September 2014

काव्यांकित शुभेच्छा .. 

दिवस आजचा, आनंदाचा, खरोखरी हा आहे ..
जन्मदिवस हा, खास व्यक्तीचा, कायम मनांत राहे ..

एक वेगळा स्नेही असा हा, निर्मळ असे मनाचा ..
एक मित्र तरी असा असावा, संग्रही प्रत्येकाच्या ..
मित्र मिळविण्या, असा कुणीही, प्रयत्न करुनी पाहे ..
जन्मदिवस हा, खास व्यक्तीचा, कायम मनांत राहे ..

जगत मित्र हा, प्रामाणिक ही, हवा हवासा वाटे ..
गुलाब पुष्पा, परी जरी हा, याला नसती काटे ..
सौजन्यही किती, या मित्राच्या, नसा नसांतुन वाहे ..
जन्मदिवस हा, खास व्यक्तीचा, कायम मनांत राहे ..

घटका गेल्या, पळेही गेली, वर्षे किती तरी सरली ..
सुखात जावो, या पुढली ही, जी दैवाने दिधली ..
शतायुषी हा, मित्र होऊ दे, आज "साठी" जो पाहे ..
जन्मदिवस हा, खास व्यक्तीचा, कायम मनांत राहे ..

दिवस आजचा, आनंदाचा, खरोखरी हा आहे ..
जन्मदिवस हा, खास व्यक्तीचा, कायम मनांत राहे ..

विजय साठे ..
०५ / ०९ / २०१४ 

Friday 5 September 2014

सुहास्य वदना, गौरीनंदना ..

सुहास्य वदना, गौरीनंदना, सेवा माझी घे ..
सेवा माझी घे, मला तू, दर्शन लवकर दे ..

आतुर होऊन, वाट पाहतो, तुझी नित्य नेमाने ..
कधी तुझी रे, पडेल दृष्टी, मजवरती प्रेमाने ..
तनामनाने, तुझिया स्वाधीन, सेवा माझी घे ..
सेवा माझी घे, मला तू, दर्शन लवकर दे ..

वेळोवेळी, उच्चारण मी, करतो तव नामाचे ..
म्हणुन समजले, मजला आता, महत्त्व या सार्याचे ..
कर्ता ही तू, करविता ही तू, सेवा माझी घे ..
सेवा माझी घे, मला तू, दर्शन लवकर दे ..

तूच देसी रे, शक्ती मजला, जीवन हे जगताना ..
विविध अशा त्या, प्रसंगांस रे, सामोरे जाताना ..
असती तव जरी, आशिष जवळी, सेवा माझी घे ..
सेवा माझी घे, मला तू, दर्शन लवकर दे ..

सुहास्य वदना, गौरीनंदना, सेवा माझी घे ..
सेवा माझी घे, मला तू, दर्शन लवकर दे ..

विजय साठे ..
०३ / ०९ / २०१४ 



Monday 1 September 2014

जासी तू परदेशी .. 

छकुल्या सोनूल्या रे, जासी तू परदेशी ..
किती दिवसां साठी तू, अंतर आम्हां देशी ..

काळ जरी छोटा तरी, सरणे अवघड आहे ..
थोडासा हा विचार, तू ही करूनी पाहे ..
इतका तरी वेळ आतां, आहे का तुजपाशी ..
किती दिवसां साठी तू, अंतर आम्हां देशी ..

हसत हसत जा बाळा, जिथे असे ठरलेले ..
असे स्वागतांस तिथे, तारांगण भरलेले ..
चन्द्रमा तुझा असेल, तिथे आता तुजपाशी .. 
किती दिवसां साठी तू, अंतर आम्हां देशी ..

कांहीं क्षण तुला तिथे, वेगळे जरा मिळतील .. 
सहजीवन तंत्राचे, धडे तुला तिथ कळतील ..
सारे नव अनुभव ते, जपुन ठेव तुजपाशी ..
किती दिवसां साठी तू, अंतर आम्हां देशी ..

झटकुन एकांत तुझा, फडफडु दे पंख आता .. 
सुखासीन तू व्हावी, संधी तुज ही मिळता ..
एक छान ही संधी, अशी आता तुजपाशी ..
किती दिवसां साठी तू, अंतर आम्हां देशी ..

छकुल्या सोनूल्या रे, जासी तू परदेशी ..
किती दिवसां साठी तू, अंतर आम्हां देशी ..

विजय साठे ..
२९ / ०८ / २०१४ 

  
  
शुभेच्छा ..

कष्ट संपले  तुझे,  दुःख ही सारी सरली ..
आनंदमयी वर्षं आता, केवळ ती उरली ..

चल आता सामोरे, जाऊ नविन पर्वाला ..
विसरून तो भूतकाल, आणि दुखद सर्वाला ..
एक नवीन ऊर्जा ही, आता अवतरली ..
आनंदमयी वर्षं आता, केवळ ती उरली ..

चल आता शोधूया, नवी वाट नविन दिशा ..
संकल्प नवे, विषय नवे, जोपासू नव आशा ..
आशा किती नवनवीन, मने त्यांनी भरली ..
आनंदमयी वर्षं आता, केवळ ती उरली ..

चल आता जोडीने, सहजीवन नेऊ पुढती ..
झेलू नवीन आव्हाने, सांसारिक जी येती ..
दुसरी इच्छा आता, कोणतीच ना उरली ..
आनंदमयी वर्षं आता, केवळ ती उरली ..

कष्ट संपले  तुझे,  दुःख ही सारी सरली ..
आनंदमयी वर्षं आता, केवळ ती उरली ..

विजय साठे ..
०१  / ०९ / २०१६