Sunday 9 November 2014

पूर्वेला आसमंती

पूर्वेला आसमंती, जशी पहाट जागली ..
कवेतली निशा तेंव्हा, लपुन छपुन निसटली ..

पहाटेचा रंग रंग, होता छान लाजरा ..
आकाशाच्या पाठीवर खूप दिसे साजरा ..
छाप त्याची लगोलगी, मनावरी उमटली ..
पूर्वेला आसमंती, जशी पहाट जागली ..

पूर्वरंग शैशवाचा, नाजुकसा भासला ..
आकाशाच्या भालावरी, भरा भरा साठला ..
खेळ त्याचे पाहुनी, नजर ही सुखावली ..
पूर्वेला आसमंती, जशी पहाट जागली ..

गालावरी लाली जशी सुंदरशी उमटली ..
गोड गुलाबी तशीच आकाशी दाटली ..
आठवणींच्या कुशीत, सहजी सामावली ..
पूर्वेला आसमंती, जशी पहाट जागली ..

पूर्वेला आसमंती, जशी पहाट जागली ..
कवेतली निशा तेंव्हा, लपुन छपुन निसटली ..

विजय साठे .. 
०२ / ११ / २०१४ 

    
आनंदाने जगा जरा

मजा करा मजा करा, दुःखाना क्षणभर विसरा ..
आनंदाने जगा जरा, हाच सुखाचा मार्ग खरा ..

कोणीही नसतो सुखी इथे, दुःख ही कोणा ना चुकते ..
मन ही या मधे भरकटते, चित्त त्या मुळे स्थिर नसते ..
शांत मनाने, जन हो आता, विचार याचा म्हणुन करा ..
आनंदाने जगा जरा, हाच सुखाचा मार्ग खरा ..

जरी असती दिसती नाती, घडी संकटी खरी कळती ..
क्षणार्धात ती विरघळती, तेंव्हा त्यांची ये प्रचीती ..
दूर दृष्टीने, मंडळी आता, ध्यानी मनी हे तुम्ही धरा ..
आनंदाने जगा जरा, हाच सुखाचा मार्ग खरा ..

नात्यांच्या ही पलीकडले, पाहिजेच आता घडले ..
प्रत्येकाला नवीन स्नेही, इथे पाहिजे सापडले ..
शोधक नजरेने मित्र हो, अव्याहत हां शोध करा ..
आनंदाने जगा जरा, हाच सुखाचा मार्ग खरा ..

नव नाती ही अशी जोडुनी, आनंदी क्षण वाढावे .. 
ज्याला जैसे जमेल त्याने याचे वाटेकरी व्हावे ..
मने मिळवुनी, सारे मिळुनी, चांदण्यात या फिरू जरा ..
आनंदाने जगा जरा, हाच सुखाचा मार्ग खरा ..

मजा करा मजा करा, दुःखाना क्षणभर विसरा ..
आनंदाने जगा जरा, हाच सुखाचा मार्ग खरा ..

विजय साठे ..
३० / १० / २०१४      

Monday 3 November 2014

मारुती राया अंजनी सुता .. 

मारुती राया, अंजनी सुता, श्रेष्ठ तुझा हा मान ..
बोला सारे, मिळुन संगती, जय जय हनुमान ..

झेप घेऊनी, गगनी जासी, सूर्याला तू धराया ..
घाबरु लागे, धरणी आणि, आसमंत कंपाया ..
सेवक असण्या श्रीरामांचा, किती तुला अभिमान ..
बोला सारे, मिळुन संगती, जय जय हनुमान ..

महाबली तू, सौख्यकारी तू, असशी भाग्यविधाता .. 
दीननाथ तू, लोकनाथ तू, असशी रे, पुण्यवंता ..
भक्तगणांच्या, मनांत राही, जेष्ठ तुझे रे स्थान .. 
बोला सारे, मिळुन संगती, जय जय हनुमान ..

भीमरूप तू, महाबली तू, अफाट तुझी रे शक्ती ..
छाती फाडून, देसी दाखवुन, श्रीरामा प्रति भक्ती .. 
रामरूपी तू, संकटमोचक, असशी शक्ती स्थान ..
बोला सारे, मिळुन संगती, जय जय हनुमान ..

मारुती राया, अंजनी सुता, श्रेष्ठ तुझा हा मान ..
बोला सारे, मिळुन संगती, जय जय हनुमान ..

विजय साठे ..
२४ / १० / २०१४ 

  

Sunday 2 November 2014

रूपेरी, चंदेरी, सोनेरी, राती .. 

रूपेरी, चंदेरी, सोनेरी, राती ..
रोज रोज येती, आणि, पटा पटा जाती ..

दिवसाचा हातामधे, घेऊनिया हात ..
रात शिरे घरोघरी, हलके झोकांत ..
राहती प्रेमात तिथे, सर्वांच्या सांगाती ..
रूपेरी, चंदेरी, सोनेरी, राती ..

पाहत असती कोणी, वाट रात होण्याची ..
कोणी वाट पाहती, निशा इथे सरण्याची ..
कुणीही असो सार्यांची, रात असे सांगाती ..
रूपेरी, चंदेरी, सोनेरी, राती ..

रातीच्या साथीने, नवजीवन उमलते ..
सहजीवन संगतीने, रातीच्या बहरते ..
राती सवे, सहजी जुड़ती, स्नेहांकित नाती ..
रूपेरी, चंदेरी, सोनेरी, राती ..

विजय साठे ..
२२ / १० / २०१४ 




वाट पाही देव राऊळी ..

वाट पाही देव राऊळी, किती दीस झाले ..
म्हणे, भक्त अजुन कसे ना, भेटण्यास आले ..

विटेवरी उभा इथे मी, असे चारी प्रहर ..
कुठेही न जाता ठेवी, भक्तांवर नजर ..
समीप जे सहजी आले, ते माझे झाले ..
वाट पाही देव राऊळी, किती दीस झाले ..

वारकरी हे संबोधन, सार्या भक्तांना ..
तमा नसती बाळगती ते, भेटीस येतांना ..
आशिष पाठीशी त्यांच्या, जे जे कुणी आले ..
वाट पाही देव राऊळी, किती दीस झाले ..

उन्हाळा हिवाळा गेला, येई आता वर्षा ..
आतुर किती देव असे तो, भक्तांच्या स्पर्शा ..
अधीर होत तो ही विचारी, भक्त कुठे गेले ..
वाट पाही देव राऊळी, किती दीस झाले ..

वाट पाही देव राऊळी, किती दीस झाले ..
म्हणे, भक्त अजुन कसे ना, भेटण्यास आले ..

विजय साठे ..