Tuesday 19 May 2015

दूर दूर लांब वरी ..

दूर दूर, लांब वरी, दिसे एक छान परी,
हात हलवुनी, मला खुणावते ..
कुठे असशी हरवला, ओळखले कां मला,
एक सारखी, अशी विचारते ..

जरा ही ना आठवे, कोण असे ती बरे,
विचारांत मी स्वतःच गुंतलो ..
तरी ही कांही न स्मरे, ओळखे ती, हे ही खरे,
कांहुरांत अशा मीच वेढलो ..
तिथुनच ती, हसुन मला, दूर करी चिंतेला,
कांहीसे असेच ती सांगते ..
कुठे असशी हरवला, ओळखले कां मला,
एक सारखी, अशी विचारते ..

विनवतो मनांस मी, सांग शोध घेऊनी,
कोण असे, ती अशी रे, नाजुका ..
भूतकाळी जाऊनी, सारे पड़ताळुनी ..
पांही जरा, कोण असे, ती कालिका ..
ती मात्र तशीच तिथे, माझी गंमत बघते,
नविन हाव भाव, करित राहते ..
कुठे असशी हरवला, ओळखले कां मला,
एक सारखी, अशी विचारते ..

कांही करून समजेना, कोडे हे उमजे ना,
उत्तर कैसे याचे शोधावे ..
ती नक्की हितचिंतक, प्रश्न तरी हा जाचक,
काय आता मी तरी करावे ..
परीला आता कळले, तिला मी न ओळखले,
म्हणे, येऊन तुला समजविते ..
कुठे असशी हरवला ओळखले कां मला,
एक सारखी, अशी विचारते ..

परी आली मज जवळी, आणि म्हणे दे टाळी,
क्षणार्धांत, तुजला मी हरवले ..
कल्पना तुझ्या मनीची, अलौकिक प्रेमाची,
त्यांतच मी, अरे तुला गुंफले ..
कां असा तु गोंधळला, सांग ना आता तु मला,
शांत हो, तुला आता मी सावरते ..
कुठे पुन्हा हरवु नको, स्वतःला तु विसरु नको,
तुला आता, हेच मी रे, शिकविते ..

दूर वरली छान परी, येऊन माझ्या दारी,
हात हलवुनी, मला सुनावते ..
कुठे पुन्हा हरवु नको, स्वतःला तु विसरु नको,
मनां पासुनी, ती हे शिकविते ..  

विजय साठे ..
१८ / ०५ / २०१५ 








Friday 15 May 2015

सहजीवन तुझ्या सवे ..

सहजीवन तुझ्या सवे, सहज किती झाले ..
मार्ग क्रमण किती केले, जराही ना कळले ..

सुख दुःखा चे किती क्षण, जोडीने अनुभवले ..
कांही असती आवडले, कांहीनी दुखवले ..
अनुभव सारे जवळी, तू अन मी ठेवले ..
सहजीवन तुझ्या सवे, सहज किती झाले ..

अवघड कांही प्रसंग, जीवनांत आपल्या ..
पुढती आलो आपण, सारून चुका त्यांतल्या ..
पाठीशी तू म्हणुनी, दुःखाचे क्षण सरले ..
सहजीवन तुझ्या सवे, सहज किती झाले ..

किती पाने गळतांना प्रवासांत पाहिली ..
आठव त्यांची केवळ मनां मधे राहिली ..
अंतरंगी विलीन जरी होते ते आपले ..
सहजीवन तुझ्या सवे सहज किती झाले ..

कलिका वेली वरल्या, फुले त्यांची झाली ..
चैतन्या घेऊनिया, नविन पिढी आली ..
जीवन व्याख्या आता, कशी अशी बदले ..
सहजीवन तुझ्या सवे, सहज किती झाले ..

सांभाळुन या पुढती, तुला मला जगणे ..
उर्वरीत जीवनांत, पुढती आता जाणे ..
रमत गमत क्षण जगुया, भगवंते जे दिधले ..
सहजीवन तुझ्या सवे, सहज किती झाले ..

सहजीवन तुझ्या सवे, सहज किती झाले ..
मार्ग क्रमण किती केले, जराही ना कळले ..

विजय साठे 
१६ / ०५ / २०१५ 

   
वेली वरच्या नाजुक कलिका ..

वेली वरच्या, नाजुक कलिका, कधी अलगद त्या फुलल्या ..
नाही समजले, हळु हळू त्या, केंव्हां, कधी उमलल्या ..

वेलच होती, पाहिली मी ती, आनंदे डुलतांना ..
वृक्षाला ती, बिलगुन राही, सवे साथ जगतांना ..
कान्हा मात्रा, आयुष्याच्या, तिने नक्की तिथ शिकल्या ..
वेली वरच्या, नाजुक कलिका, कधी अलगद त्या फुलल्या ..

वेल नाजुका, हलके हलके, तारुण्या प्रती आली ..
एक वेगळी, सौंदर्याची, लाली तिजवर सजली ..
प्रतिमा प्रेमाच्या, चेहर्यावर, दिसती तिच्या त्या रुजल्या ..
वेली वरच्या, नाजुक कलिका, कधी अलगद त्या फुलल्या ..

ऋतु बदलले, सर्वांगावर, चैत्र पालवी सजली ..
मातृत्वाची, घेत प्रचिती, वेल पहा कशी नटली ..
अनंत कोमल, कलिका दिसती, जागो जागी रुजल्या ..
वेली वरच्या, नाजुक कलिका, कधी अलगद त्या फुलल्या ..

वेली वरच्या, नाजुक कलिका, कधी अलगद त्या फुलल्या ..
नाही समजले, हळु हळू त्या, केंव्हां, कधी उमलल्या ..

विजय साठे ..
१४ / ०५ / २०१५ 


     

Saturday 9 May 2015

प्रकाशांच गाणं .. 

प्रकाशांच गाणं, कुणी तरी गांव ..
मनांच म्हणणं, कुणी तरी ऐकांव ..

छेडलेली सतार, बरंच कांही सांगते ..
जवळच्या गुणांना, तळमळीने देते ..
शोधा आता तुम्ही, तुम्हां काय हंव ..
प्रकाशांच गाणं, कुणी तरी गांव ..

सिद्धता ही किती, अशी छान मुरलेली ..
जीवन जगतांना, हळु हळू घडलेली ..
कुणी तरी मला, त्या वाटेंन न्यांव ..
प्रकाशांच गाणं, कुणी तरी गांव ..

वय तसं कांही नसतं, शिक्षण हे देतांना ..
ज्याला जसं हवं, घ्यावं, येतानां जातांना ..
शिकुन मात्र  आयुष्यांच, सोनं नक्की व्हांव ..
प्रकाशांच गाणं, कुणी तरी गांव ..

विजय साठे ..
०१ / ०५ / २०१५          
अस्तनीस सारुनी ..

अस्तनीस सारुनी, खड्ग हाती घेऊनी, निग्रही योद्धा पहा निघाला ..
बाणा भासे कणखर, निश्चयी ही दिसे नजर, ध्येयपूर्ती साठी सिद्ध जाहला ..

स्फूर्ती घे कशांतुनी, काय असे खोल मनी, माहित ना ज़रा ही कुणाला ..
संकल्पित खचित असे, उरीचे नव स्वप्न दिसे, दॄढतेने वाटतसे भारला ..

बुद्धी हेच प्रमुख शस्त्र, वैचारिक साथ अस्त्र, पाजळीत, शोध घेत चालला ..
तेज सूर्य तळपला, अंधःकार लोपला, तडफदार किती तो सरसावला ..

सिद्ध साध्य सिद्धता, कांही नसे कमतरता, प्रमेयास सोडवित चालला ..
जन सामान्यांतला, चंद्र चांदण्यांतला, वलयांकित होऊनी प्रकाशला ..

अस्तनीस सारुनी, खड्ग हाती घेऊनी, निग्रही योद्धा पहा निघाला ..
बाणा भासे कणखर, निश्चयी ही दिसे नजर, ध्येयपूर्ती साठी सिद्ध जाहला ..

विजय साठे ..
०९ / ०५ / २०१५