Monday 13 April 2015

सप्तरंगी रंगुनी ..

सप्तरंगी रंगुनी, कल्पनांत हरवुनी,
स्वप्नांना सजवुनी, निघालो ..
नव्हते कधीही ध्यानी, किंवा कधी तसे मनी
कैफात आगळ्या मी, न्हालो ..

रंगात दंग मी, कारण स्वच्छंदी मी ..
वेगळाच अनुभवतो, हा नव आनंद मी ..
स्वतःशीच बोलुनी, हळु हळू चालुनी ..
माहीत ना मी कसा, तरंगलों ..
सप्तरंगी रंगुनी, कल्पनांत हरवुनी,
स्वप्नांना सजवुनी, निघालो ..

अनुभूती ही अशी, खचितच आहे खाशी ..
नवलाईच्या राशी, जाणिव ही ना जराशी ..
ठेवा हा उघडुनी, ख़ास कांही निवडुनी, विसावलो ..
सप्तरंगी रंगुनी, कल्पनांत हरवुनी,
स्वप्नांना सजवुनी, निघालो ..

कल्पनांच जरी असती, अप्रतीम तरी ठरती ..
ना कळता किती देती, सौख्याची त्या प्रचिती ..
वेचुनी त्यां साठवुनी, मनांमधे गाठवुनी ..
संगतीत त्यांच्या मी, रंगलो ..
सप्तरंगी रंगुनी, कल्पनांत हरवुनी,
स्वप्नांना सजवुनी, निघालो ..

विजय साठे 
२२ / ०२ / २०१५ 



  

No comments:

Post a Comment