Tuesday 2 June 2015

अगदी सहजा सहजी जडले, नाते आकाशाशी .. 

अगदी, सहजा सहजी जडले, नाते आकाशाशी ..
कल्पना ही ना, केली याची, मी माझ्या मनाशी ..

किनाऱ्यावरी, बसले होते, एका शांत पहाटे ..
एकटेपणा, एक सारखा, विचारांतुनी दाटे ..
वैचारिक मंथन चाले, मी हुज्जत घाली स्वतःशी ..
कल्पना ही ना, केली याची, मी माझ्या मनाशी ..

निसर्गासवे, जोडू जवळीक, असे ही होई चिंतन ..
वृक्ष असावे, वल्ली असाव्या, आणि असावे त्रिभुवन ..
नक्की कुणाला, माझे समजू, समजुन काय कशाशी ..
कल्पना ही ना, केली याची, मी माझ्या मनाशी ..

नभांगणातील, चन्द्र तारका, मोहुन मजला गेल्या ..
निर्णय झाला त्या, आज पासुनी, केवळ माझ्या झाल्या ..
अतूट नाते, जपतील निश्चित, केवळ त्या माझ्याशी ..
कल्पना ही ना, केली याची, मी माझ्या मनाशी ..

अगदी, सहजा सहजी जडले, नाते आकाशाशी ..
कल्पना ही ना, केली याची, मी माझ्या मनाशी ..

विजय साठे ..
०२ / ०६ / २०१५ 

No comments:

Post a Comment