Tuesday 16 September 2014

निसटुन गेले, जे क्षण ..  

घटका गेल्या, पळे उलटली, तास ही झटपट सरले ..
निसटुन गेले, जे क्षण कधीही, उलटुन नाही परतले ..

लहानपण जे, अत्यानंदी, भुरभुर कधीच उडाले ..
वेगही इतका, मागे धावुन, कधीही नाही मिळाले ..
केली विनवणी, तरीही कोणा, नाही अजुन गवसले ..
निसटुन गेले, जे क्षण कधीही, उलटुन नाही परतले ..

लहानपण ते, क्षणांत विरले, तरूण पण अवतरले ..
कधी पोहोचलो, गृहस्थाश्रमी, मलाही नाही समजले ..
एकांती मी, असताना मज, तरूण पण आठवले ..
निसटुन गेले, जे क्षण कधीही, उलटुन नाही परतले ..

आता झालो, वृद्ध मी किती, मजला सहजी रुचे ना ..
लेखा जोखा, मांडुन ही मज, मेळ कधीही जमे ना ..
फरक क्षणांचा, लागे मज जे, प्रवासांत विरघळले ..
निसटुन गेले, जे क्षण कधीही, उलटुन नाही परतले ..

घटका गेल्या, पळे उलटली, तास ही झटपट सरले ..
निसटुन गेले, जे क्षण कधीही, उलटुन नाही परतले ..

विजय साठे .. 
१६ / ०९ / २०१४  

No comments:

Post a Comment