Saturday 13 September 2014

दारा वरती, हलकी टक टक ..

दारा वरती, हलकी टक टक, करुनी कुणी विचारी ..
म्हणे, मला जर, जागा दिधली, मी तुमचा आभारी ..

वाटत होता, ओळखीतला, नांव तरीही स्मरेना ..
असे कसे हे, होई याचे, कारण मज उमजेना ..
असे विलक्षण, तेजस्वी अन, मुद्रा दिसे करारी ..
म्हणे, मला जर, जागा दिधली, मी तुमचा आभारी ..

आहे मी ही, तुमच्या पैकीच, नसे कोणी मी नवा ..
धकाधकीचे, जीवन जरी ही, तरी ही मज आठवा ..
म्हणे जिथे मी, जाई देतसे, कायम तिथे उभारी ..
म्हणे, मला जर, जागा दिधली, मी तुमचा आभारी ..

सुचे ना मला त्या वेळी मी आता काय करावे
मन सांगे मज एकसारखे त्याला घरांत घ्यावे
ठरले सरती दिधली जागा अनाहुता त्या प्रहरी
म्हणे, मला जर, जागा दिधली, मी तुमचा आभारी ..

हळू हळू मग, कळले सारे, गुपीत या कोडयाचे ..
वादळ होते ते, एक छानसे, उधाण आनंदाचे ..
आनंदाच्या, संगती आता, जुड़ती मंडळी सारी ..
म्हणे, आता तो, त्या सार्यांना, मी तुमचा आभारी ..

सांगत असतो, येता जाता, दुःखी नका कुणी होऊ ..
आनंदाने, खुल्या मनाने, दुःखा वाहुन नेऊ ..
सुखी जीवनाची, गुरुकिल्ली, आहे ही खरी न्यारी ..
राहीन आता, तुम्हां संगती, मी तुमचा आभारी ..

दारा वरती, हलकी टक टक, करुनी कुणी विचारी ..
म्हणे, मला जर, जागा दिधली, मी तुमचा आभारी ..

विजय साठे ..
१३ / ०९ / २०१४
 
No comments:

Post a Comment