Sunday 24 August 2014

गीत यावे तव गळ्यातुंन ..

लेखणी दे गीत आणि, वाद्य देई संगीताला ..
गीत यावे तव गळ्यातुंन, म्हणती दोघे गायकाला ..

लेखणीला माहिती ना, कसे सुचती शब्द ते ..
वाद्य ही प्रसवे सुरांना, जे जसे कुणी छेड़ी ते ..
पाहिजे आता असा जो, मनोगत हे समजला ..
गीत यावे तव गळ्यातुंन, म्हणती दोघे गायकाला ..

वाहे कधी शब्दांतुनी, करुणा रसाच्या कावडी ..
तर कधी ते वाहती, आनंद मिश्रित रेवडी ..   
शब्द गंगा पाजुनी, शमवा कुणी त्या चातकाला .. 
गीत यावे तव गळ्यातुंन, म्हणती दोघे गायकाला ..

शौर्य ध्वनी कधी कानी येई, तर कधी त्या प्रेम लहरी ..
भक्ती सूर ही कांही वेळा, भूपाळी ही कधी प्रथम प्रहरी ..
ओतून वाद्यांतुन सुरांना, जागवा साऱ्या जगाला ..
गीत यावे तव गळ्यातुंन, म्हणती दोघे गायकाला ..

सरसावला गायक आता हा, पाहुनी, ऐकून सारे ..
म्हणे शब्दां अन सुरांना, सारे तुम्ही, साथीस या रे ..
एक अभिनव गीत गाण्या, गायक असे तो सिद्ध झाला ..
गीत यावे तव गळ्यातुंन, म्हणती दोघे गायकाला ..

लेखणी दे गीत आणि, वाद्य देई संगीताला ..
गीत यावे तव गळ्यातुंन, म्हणती दोघे गायकाला ..

विजय साठे ..
२१ / ०८ / २०१४ 

No comments:

Post a Comment