Monday 29 December 2014

हाती जपाची माळ घ्यावी ..

हाती जपाची माळ घ्यावी, नामस्मरण करावे ..
नेमाने त्या विधात्याचे, नाम मुखी भजावे ..

तोच देता तोच घेता, आठव त्याची व्हावी ..
जात्यावर जशी बसल्या वरती, ओवी सहज सुचावी ..
विचार चिंता दुसरे तेंव्हा, मनांत कांही नसावे ..
नेमाने त्या विधात्याचे, नाम मुखी भजावे ..

जप जाप्याने मिळते ऊर्जा, आणि शक्ती अमाप ..
संचय त्याचा सहजी जाणवे, कुणाही आपोआप ..
अनुष्ठान हे प्रत्येकाच्या, घरोघरी असावे ..
नेमाने त्या विधात्याचे, नाम मुखी भजावे ..

व्यथा कितीही अवती भवती, प्रत्येकाच्या असती ..
मुखी नाम ते घेता सार्या, क्षणार्धात विरघळती ..
तेजाने नामाच्या पुरते, जीवन उजळुन जावे ..
नेमाने त्या विधात्याचे, नाम मुखी भजावे ..

हाती जपाची माळ घ्यावी, नामस्मरण करावे ..
नेमाने त्या विधात्याचे, नाम मुखी भजावे ..

विजय साठे ..

No comments:

Post a Comment