Monday 29 December 2014

फांदीवरी चिमणी पहा .. 

फांदीवरी चिमणी पहा, त्या चिमुकल्यांना भरवते ..
एकेक दाणा भरवुनी, ती कशी पहा त्यां जगवते ..

घरट्यातली पिल्ले रहाती, चोची अपुल्या उघडुनी ..
नक्कीच येईल पाणी दाणा, हीच खात्री ठेऊनी ..
माय ती येऊन जाऊन, भूक त्यांची शमविते ..
एकेक दाणा भरवुनी, ती कशी पहा त्यां जगवते ..

जिव्हाळ्याचे हे किती, नाते अतुट निर्मळ असे ..
बिलगता आईस पिल्ले, रम्य हे किती तरी दिसे ..
कष्ट करुनी माय ती, अपुल्या पिलां जोपासते ..
एकेक दाणा भरवुनी, ती कशी पहा त्यां जगवते ..

दिवस सरती होत जाती, मोठी तिची पिल्ले पहा ..
भुरभूर उडुनी जाती सारी, दिशांना ती त्या दहा ..
घरट्या मधे ती एकटी मग, वाट त्यांची पाहते ..
एकेक दाणा भरवुनी, ती कशी पहा त्यां जगवते ..

कां अशी ही वेळ तिज वर, यावी कुणी सांगेल का ..
काय चुकले आज वर, समजावुनी देईल का ..
दुःख वाटे किती मनी, पाहून द्रावक चित्र ते ..
शिदोरी वर आठवणींच्या, एकटी ती चालते ..

एकटी ती चालते ..

विजय साठे ..
०४ / १२ / २०१४ 




No comments:

Post a Comment