Sunday 9 November 2014

आनंदाने जगा जरा

मजा करा मजा करा, दुःखाना क्षणभर विसरा ..
आनंदाने जगा जरा, हाच सुखाचा मार्ग खरा ..

कोणीही नसतो सुखी इथे, दुःख ही कोणा ना चुकते ..
मन ही या मधे भरकटते, चित्त त्या मुळे स्थिर नसते ..
शांत मनाने, जन हो आता, विचार याचा म्हणुन करा ..
आनंदाने जगा जरा, हाच सुखाचा मार्ग खरा ..

जरी असती दिसती नाती, घडी संकटी खरी कळती ..
क्षणार्धात ती विरघळती, तेंव्हा त्यांची ये प्रचीती ..
दूर दृष्टीने, मंडळी आता, ध्यानी मनी हे तुम्ही धरा ..
आनंदाने जगा जरा, हाच सुखाचा मार्ग खरा ..

नात्यांच्या ही पलीकडले, पाहिजेच आता घडले ..
प्रत्येकाला नवीन स्नेही, इथे पाहिजे सापडले ..
शोधक नजरेने मित्र हो, अव्याहत हां शोध करा ..
आनंदाने जगा जरा, हाच सुखाचा मार्ग खरा ..

नव नाती ही अशी जोडुनी, आनंदी क्षण वाढावे .. 
ज्याला जैसे जमेल त्याने याचे वाटेकरी व्हावे ..
मने मिळवुनी, सारे मिळुनी, चांदण्यात या फिरू जरा ..
आनंदाने जगा जरा, हाच सुखाचा मार्ग खरा ..

मजा करा मजा करा, दुःखाना क्षणभर विसरा ..
आनंदाने जगा जरा, हाच सुखाचा मार्ग खरा ..

विजय साठे ..
३० / १० / २०१४      

No comments:

Post a Comment